बीड : कोरोनामुळे आदित्य महाविद्यालयात स्थलांतरित केलेले जिल्हा रुग्णालय मंगळवारपासून पुन्हा जुन्या इमारतीत कार्यान्वित करण्यात आले आहे. आदित्यमधील स्थलांतरित रुग्णालय बंद केले असून आता ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया अशा सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच एकाच छताखाली सुरू होणार आहेत. त्यामुळे यापुढे जुन्या इमारतीतच उपचारासाठी यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मागील दीड वर्षापासून जिल्हा रुग्णालयातील ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया विभाग हे कोरोनामुळे आदित्य महाविद्यालयात हलविण्यात आले होते. परंतु आता कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने हे सर्व विभाग पुन्हा जुन्या इमारतीत आणण्याची मागणी जोर धरू लागली होती. आदित्य महाविद्यालय हे शहरापासून दूर असल्याने आणि रस्ता व्यवस्थित नसल्याने सामान्यांचे हाल होत होते. सामान्यांची मागणी आणि रुग्णसंख्या कमी झाल्याचे पाहून आरोग्य विभागाने स्थलांतरित रुग्णालय बंद करून ते सर्व विभाग पूर्वीच्या जुन्या इमारतीत आणले आहेत. मंगळवारपासून ओपीडी व आयपीडीसह शस्त्रक्रिया आणि इतर सुविधा या एकाच छताखाली मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. यापुढे जुन्या इमारतीतच उपचारासाठी यावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
--
आदित्यमधील स्थलांतरित रुग्णालय बंद केले आहे. मंगळवारपासून सर्व सुविधा जसे की ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया आदी सोयी, सुविधा जुन्या इमारतीतच दिल्या जाणार आहेत. रुग्णांसह नातेवाइकांनी आता तिकडे न जाता जुन्या इमारतीत येऊन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.
- डाॅ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड