- प्रभात बुडूख
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील संतोष बलभीम जगताप या शेतकऱ्याच्या विहिरीला भर दुष्काळात अवघ्या २४ फुटांवर पाणी लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून विहीर पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
जिल्ह्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे. विहिरींचे पाणी आटलेले आहे. अशा परिस्थितीत विहिरीला पाणी लागत नाही. बोअरला देखील ५०० ते ७०० फूट खोल घेऊनही पाणी लागत नाही. मात्र, पालसिंगण येथील शेतकरी संतोष जगताप हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे विहीर तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर रोजगार हमी योजनेमधून विहिरीचे काम सुरु केले. सुरुवातीला खडक लागल्यानंतर ओलसर माती लागली नंतर २४ फूटावर काम सुरु असताना मोठा पाण्याचा झरा लागला. त्यानंतर इंजिनच्या साहाय्याने पाणी उपसा करुन ३० फूटापर्यंत विहीर खोदली आहे. पाणी टिकते का हे पाहण्यासाठी दोन दिवस इंजिन सुरु ठेऊन पाणी उपसा केला मात्र, त्यानंतर देखील विहिरीचे पाणी वाढतच होते.
पोहण्याचा आनंद२०१० पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात दुपारी पोहायला जाणे हा नित्यनियम होता. परंतु सततच्या दुष्काळामुळे विहीरी आटल्यामुळे पोहणे बंद झाले होते. मात्र, संतोष यांच्या विहिरीला पाणी लागल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर मुलांनी पोहण्याचा आनंद ९ वर्षांनी घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीमुळे मागील अनेक वर्षांपासून गावात कोणाच्याही विहिरीला एवढ्या मोठ्या व कमी खोलीवर पाणी लागलेले नाही. त्यामुळे खूप आनंद होत आहे.- संतोष बलभीम जगताप, शेतकरी, पालसिंगण