माजलगांव, ( बीड ) : परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी 431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे. बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .
मागील १ महिन्यात परतीच्या पावसाने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 1 आॅगस्ट रोजी माजलगांव धरणाची पाणीपातळी 430.62 मिटर एवढी होती. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात येणा-या पाण्याची आवक वाढली. एक महिण्यात धरणाची पाणी पातळी सव्वा मिटरने वाढून आज सकाळी ते पुर्ण क्षमतेने भरले आहे .
नदीपात्रातून आवक सुरूच सध्या धरणाची पाणी पातळी 431.80 मिटर एवढी आहे. तसेच धरणात 560 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक सिंधफणा व कुंडलिका नदी पात्रातून सुरू आहे. धरणात 454 दलघमी एवढा पाणीसाठा असून त्यातील 312 दलघमी मिटर पाणी उपयुक्त पाणीसाठा आहे. २०११ नंतर मागील वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे धरण क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला या धरणाच्या पाण्यातून बीड, माजलगांव या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यासोबतच माजलगाव शहराजवळील ११ खेड्यांची पाणी पुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे या गावांचाही पाणीप्रश्न सुटला आहे.