बीड - दरवर्षी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केलं जाते. पण, यंदा प्रथमच भगवान बाबा यांच्या जन्मस्थळी सावगरगाव येथे हा मेळावा होत आहे, असे म्हणत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. तसेच छोट्या भाऊजींना फॅनफॉलविंग आहे, हे आज मला कळालं. जानकरसाहेब, आता माझ्या पतीलाही रासपमध्ये घ्या! असे प्रीतम यांनी म्हणताच महादेव जानकर यांनीही डॉ. गौरव खाडे यांना दोन्ही हातांनी उचलले.
खासदार प्रीतम मुंडे यांचे पती डॉ. गौरव खाडे प्रथमच दसरा मेळाव्याला हजर राहिले होते. तर, पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे हे दरवर्षी दसरा मेळाव्याला हजर राहतात. यापूर्वी भगवान गडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्याला पंकजा मुंडेंचे पती, अमित पालवेंना मी रासपमध्ये घेणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले होते. त्यावेळी उपस्थितीतांनी जल्लोष केला होता. त्यानुसार, आज प्रीतम यांनी, माझ्या पतीलाही रासपमध्ये घ्या, असे आवाहन जानकर यांच्याकडे भाषणादरम्यान केले. त्यावेळी उपस्थितांनीही त्यास दाद दिली. तर स्वत: जानकर यांनी गौरव यांना आपल्या हातांनी उचलून प्रीतम मुंडेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
यंदाचा दसरा मेळावा पाथर्डीतील सावरगाव येथे पार पडला. सुरुवातीलाच प्रीतम मुंडे यांचे भाषण झाले. गोपीनाथगड ते सावरगाव या मार्गावर त्यांनी काढलेल्या रॅलीलाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे नावे घेत असताना त्यांनी आई प्रीतम मुंडे, तसेच सासूबाई, पती डॉ. गौरव खाडे पहिल्यांदाच मेळाव्याला उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. गौरव खाडे यांचे नाव उच्चारताच उपस्थितांतून टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असल्यापासून दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे उपस्थित राहतात. मात्र, यंदा प्रथमच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे पती डॉ. गौरव खाडे उपस्थित राहिले.
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात खासदार प्रितम मुंडे यांनाही धडाकेबाज भाषण केले. भगवान बाबांच्या सदरा मेळाव्याचा मान दरवर्षी नगर जिल्ह्याला मिळत होता, पण यंदा प्रथमच हा मान आपल्या बीड जिल्ह्याला मिळाल्याचे प्रतिम मुंडे यांनी म्हटले. त्यानंतर, उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भगवान बाबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्यामुळेच हा मान बीड जिल्ह्याला मिळाला आहे. मी बीडची खासदार म्हणून आपले आभार मानते.