अंबाजोगाई : तालुक्यात अनेक गावांमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. आता हे बंधारे सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नादुरुस्त झाले आहेत. अनेक बंधाऱ्यांना मोठमोठ्या भेगा पडल्याने हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष; झाडे होताहेत कमी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर परिसरात वन विभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांच्या फांद्या तोडून आणत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
उन्हाची तीव्रता वाढली
अंबाजोगाई : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. कोरोना राेखण्यासाठी लॉकडाऊन असले तरी शीतपेय, फळांची खरेदी लोक सवलतीच्या वेळेत करत आहेत.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
बीड : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन चोऱ्यांचे शोध लावावेत, अशी मागणी केली जात आहे; परंतु अद्यापही या मागणीकडे गांभीर्याने घेतले जात नाही.
दुर्लक्षामुळेे वाढतोय संसर्ग
वडवणी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचे नियम मोडणारांवर कारवाईसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून देण्याची मागणी होत आहे.