जीर्ण तारा,
खांबामुळे धोका
अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युततारा जीर्ण झालेल्या आहेत. तर, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युतखांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युतखांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांनी केली आहे.
कृषी विभागाच्या बंधाऱ्याची दुर्दशा
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक गावांमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधाऱ्यांची कामे करण्यात आली होती. अनेक बंधाऱ्यांना मोठमोठ्या भेगा पडल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे हे बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. या बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते प्रशांत आदनाक यांनी केली आहे.
मंदिर परिसरात शुकशुकाट
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवू लागला आहे.
रस्त्यावरील फांद्या ठरताहेत धोकादायक
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
वाळूचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षात वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते १६ हजार रुपयांना मिळणाऱ्या वाळूच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुप्पटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.