बीड: दहा वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभा करुन प्लॉट हडप केल्याची घटना १३ नोव्हेंबरला शहरात समोर आली. याबाबत शिवाजीनगर ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. ज्योती नवनाथ वारे (रा.बेदरवाडी ता.भूम जि.उस्मानाबाद), पठाण जाकेर खान जाफर, सय्यद शफिकोद्दीन शरीफोद्दीन जुन्हा (दोघे रा.बालेपीर , बीड) व अन्य एक अनोळखी यांचा आरोपींत समावेश आहे.
शेख मुर्तजा शेख मसूद (रा.केसापुरी कॅम्प, माजलगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील शेख मसूद शेख अहमद हे सिंचन विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत होते. ३० एप्रिल २००० रोजी ते निवृत्त झाले. १६ जुलै २०१३ रोजी गेवराईजवळ त्यांचा अपघात झाला, यात त्यांचे निधन झाले. शासन सेवेत असताना सिंचन विभागातील कर्मचाऱ्रूांनी तळेगाव (ता.बीड) येथे सिंचन गृहनिर्माण सोसायटी लि.तळेगाव या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या सभासदांनी एकत्रित येऊन प्लॉट खरेदी केले होते. शेख मसूद यांच्या नावे १५०० चौरस फुटाचा ११४ क्रमांकाचा प्लॉट होता. या प्लॉटची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले. तपास सहायक निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
शेख मसूद असल्याचे भासवणारा नेमका कोण...दरम्यान, या प्लॉटची परस्पर विक्री केल्याचा प्रकार शेख मुर्तजा यांना कळाल्यावर त्यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी केली. रजिस्ट्रीची नक्कल काढली असता शेख मसूद यांच्या नावे असलेला प्लॉट २ फेब्रुवारी २०२१ रोजी परस्पर नावे करुन घेतल्याचे उघड झाले. यावरुन खरेदीदार ज्योती नवनाथ वारे (रा.बेदरवाडी ता.भूम जि.उस्मानाबाद) , साक्षीदार पठाण जाकेर खान जाफर , सय्यद शफिकोद्दीन शरीफोद्दीन जुन्हा (दोघे रा.बालेपीर , बीड) व शेख मसूद असल्याचे भासवून त्यांच्या नावे सह्या करणारा बनावट व्यक्ती या चौघांवर गुन्हा नोंद झाला.