बीड : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रमुख भूमिका असते. तसेच कोरोनाच्या काळात जोखमी असताना देखील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले होते. त्यामुळे कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये पहिला डोस घेण्यात आघाडीवर असलेले जिल्हा पोलीस दल लसीचा दुसरा डोस घेण्यात मात्र पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना डोस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पहिला डोस घेतल्यापासून साधारण १ महिन्यानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनीच लसीचा दुसरा डोस घेतल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या २१९० इतकी आहे. त्यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्या कर्मचारी १५६१ इतके आहेत. तर, अधिकाऱ्यांची संख्या १८० असून त्यापैकी १२९ अधिकाऱ्यांनीच पहिला लसीचा डोस घेतला आहे. उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतलेला नाही. तर, दुसरा लसीचा डोस २६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर, फक्त ५ अधिकाऱ्यांचा दुसरा डोस घेण्यात सहभाग आहे. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी कोरोना लस घ्यावी असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ऐकूण पोलीस कर्मचारी १२९०
लस घेतलेले पोलीस कर्मचारी १५६१
जिल्ह्यातील पोलीस अधिकारी १८०
लस घेतलेले पोलीस अधिकारी १२९
दुसऱ्या टप्प्यातील लस घेणारे कमी
पहिल्या टप्यात लस घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लस घेणे गरजेचे आहे. तरच, त्या लसीचा प्रभाव वाढतो व कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते. पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यामुळे त्यांचा संपर्क सर्वसामान्य नागरिकांशी जास्त असतो त्यामुळे दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. मात्र, फक्त ५ अधिकारी व २६ कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचे दिसून येत आहे.