बीड : जिल्हा रूग्णालयातील गलथान कारभार बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी स्वत: पाहिला. मुख्य गेटवरील सुरक्षा सोडून पोलीस चौकीत बसले होते. तर रक्षकही इतरत्र फिरत होते. तसेच रूग्णालय परिसरात अस्वच्छताही दिसली. यावर जिल्हाधिकारी चांगलेच भडकले. तसेच अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करीत मुकादमांनान निलंबीत करण्याच्या सुचना केल्या.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज हजार रूग्ण आढळत असल्याने खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यातच जिल्हा रूग्णालयांसह इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. तसेच अस्वच्छता, सुरक्षा आणि नातेवाईकांचा कोरोना वॉर्डमधील वावर वारंवार समोर येत होता. हाच धागा पकडून बुधवारी सकाळीच जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्हा रूग्णालयाला अचानक भेट दिली. प्रवेश करताच ते ऑक्सिजन प्लांटकडे गेले. त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसली. तसेच वाहनेही अस्ताव्यस्त पार्क केल्याचे दिसले. रूग्णवाहिका आणि ऑक्सिजनच्या वाहनांनाही ये-जा करण्यासाठी रस्ता नव्हता. तसेच नातेवाईकही त्यांच्या समोरूनच वॉर्डमधून बाहेर फिरत होते. हा सर्व प्रकार पाहताच जगताप भडकले. पोलीस, सुरक्षा रक्षक आणि मुकादमाला धारेवर धरत निलंबीत करण्याच्या सुचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वता: भेट दिल्याने येथील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यांनी त्रूटी दाखवित सुधारण्याच्या सुचना केल्या असल्या तरी यात किती सुधारणा होते, हे येणारी वेळच सांगेल.
चौकीतील पोलिसांना झापले
नातेवाईकांनी कोरोना वाॅर्डमध्ये जावू नये, यासाठी पोलिस कर्मचारी, होमगार्ड, सुरक्षा रक्षक नियूक्त केलेले आहेत. परंतू पोलिस कर्मचारी गायब होते तर होमगार्ड चौकीत बसले होते. हे समजताच जगताप थेट चौकीत गेले आणि बसलेल्या लोकांना चांगलेच झापले.
मुकादमांच्या तक्रारी वाढल्या
मुकादमानी सर्व कक्षसेवकांकडून स्वच्छता करून घेणे गरजेचे आहे. परंतु ते याकडे दूर्लक्ष करतात. दोन दिवसांपूर्वीच एका मुकादमाविरोधात मद्यपान करून वॉर्डबॉयला आवडीच्या वॉर्डमध्ये ड्यूटी लावल्याची तक्रार आहे. याच वॉर्डबाॅयन नर्ससोबत गैरप्रकार केला होता. आता या प्रकरणाची चौकशी अद्याप बाकी आहे. दरम्यान, या मुकादमाने माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर वॉर्डबॉयला जमा करून निवेदन देण्याचा सल्ला दिला. काम सोडून इतर उचापत्या करण्यात मुकादम जास्त व्यस्त आहेत. त्याच्यावर आता काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
सीएस उशिराने आले तर एसीएस फिरकलेच नाहीत
मंगळवारी रात्री खाटा अपुऱ्या पडल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते मध्यरात्री पर्यंत जिल्हा रूग्णालयात ठाण मांडून होते. तर एसीएस हे गायब होते. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी आले तेव्हा त्यांच्यासोबत आरोग्याचा एकही अधिकारी हजर नव्हते. डॉ.गित्ते उशिराने आले तर डॉ.सुखदेव राठोड फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आले.
वाहनांना आत परवानगी नाही
रूग्णालयाच्या आतमध्ये आता कोणत्याच वाहनांना परवानगी बंद करण्यात आली आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही आपली वाहने बाहेरच पार्क करण्यास सांगितले आहे. यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षक नियूक्त केले. इकडे रस्त्यावर पार्किंगला जागा नसल्याने वाहतूक कोंडी झाली होती. आतमधील त्रास कमी झाला असला तरी बाहेरील वाढला आहे.
===Photopath===
140421\14_2_bed_17_14042021_14.jpg~140421\14_2_bed_16_14042021_14.jpg
===Caption===
चौकीत बसलेल्या पोलिसांना जगताप यांनी मध्ये जावून झापले.~जिल्हा रूग्णालयातील प्रवेशद्वारावर जावून स्वता: आढावा घेताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप. सोबत तहसीलदार शिरीष वमने.