बीड : सुरक्षा रक्षक झोपेत असल्याचा फायदा घेत दोन कैद्यांनी कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याने भिंतीवरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला तर दुसरा कैदी त्याला पाहून कारागृहात परतला. हा प्रकार आज पहाटे येथील जिल्हा कारागृहात घडला.
ज्ञानेश्वर बालाजी जाधव (३०, रा.रेणापूर जि.लातूर) व विकास मदन देवकते अशी पलायण करणार्या कैद्यांची नावे आहेत. आज पहाटे स्वयंपाक बनविण्यासाठी कैद्यांना बाहेर काढले होते. कैद्यांसह मुख्य प्रवेशद्वारावर गाढ झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून ते भिंतीवर चढले. पहिल्यांदा ज्ञानेश्वर याने भिंतीवरून खाली उडी मारली आणि तो गंभीर जखमी झाला. तो पडल्याचे पाहून विकास परतला. तर जखमी झालेला ज्ञानेश्वर जखमी अवस्थेत नगर रोडवरील प्रवेशद्वाराजवळ आला. साध्या कपड्यात असलेला ज्ञानेश्वर बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहून काही नागरिकांनी त्याला रिक्षातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथील पोलिसांनी त्याला ओळखल्यानंतर कारागृह प्रशासनाला माहिती दिली. जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या. रूग्णालयात त्याच्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ज्ञानेश्वर कुख्यात दरोडेखोरज्ञानेश्वर जाधव हा कुख्यात दरोडेखोर आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यात त्याने दहशत निर्माण केली होती. अंबाजोगाई तालुक्यातील एका दरोड्यात तो जिल्हा कारागृहात बंदीस्त होता. तर विकास हा बलात्काराच्या आरोपात कारागृहात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबीतघटनेची माहिती मिळताच कारागृह उप महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. तसेच चौकशी करून जबाबदार असलेल्या प्रकाश शामराव मस्के व रमेश वामनराव हंडे या दोन कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबीत केले. तसेच सुरक्षेबाबत कारागृह प्रशासनाला सुचना केल्या.
अंधाराचा फायदा घेऊन पलायन पाणी आणण्यासाठी दोघे विहिरीवर गेले होते. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. एक परतला तर दुसर्याने पलायन केले. दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. चौकशी करून जबाबदार दोन्ही असलेल्या दोन कर्मचार्यांना निलंबीत केले आहे.- एम.एस.पवार, कारागृह अधीक्षक, बीड