आष्टी/कडा : उस्मानाबादहून नगरकडे गुटखा घेऊन जाणार टेम्पो आष्टी पोलिसांनी पकडला. यामध्ये जवळपास २० लाख रूपयांचा गुटखा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी आष्टी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कासारी गावाजवळ करण्यात आली.
उस्मानाबाद येथून नगरकडे एका हिरव्या रंगाच्या टेम्पोमधून (एमएच-०४ एफयू - ४४५०) अवैधरित्या गुटखा घेऊन जात असल्याची माहिती आष्टी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार आष्टी पोलिसांनी सापळा लावला. कासारी गावाजवळ हा टेम्पो पकडला व टेम्पोचालक कालिदास देवीदास भोसले (३५ रा.बावची ता.परांडा जि.उस्मानाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पोमध्ये गुटख्याच्या ४० बॅगांमध्ये ठेवलेला अंदाजे २० लाख रुपये किंमतीचा गुटखा व टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक एम.बी.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ गायकवाड, संजय गुजर, सचिन कोळेकर, ए.एम. सुंबरे यांनी केली. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी आष्टी ठाण्यात जावून पंचनामा केला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आष्टी पोलीस निरीक्षकांची मुजोरीआष्टी पोलीस मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत आहेत. गुरूवारी काही पत्रकार गुटख्याची माहिती घेण्यासाठी ठाण्यात गेले होते. यावेळी पोनि एम.बी.सुर्यवंशी यांनी त्यांना ठाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माध्यमांपासून माहिती लपविण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात असून आष्टी पोलीस पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.