लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील कॉफीशॉपमध्ये काही तरूण जोडपे अश्लील चाळे करताना आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वच हॉटेल आणि कॉफीशॉपवर नजर ठेवली होती. आजही त्यांच्या झडत्या सुरूच असून गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेल्या पावलाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मैत्री, प्रेमाच्या नावाखाली ‘प्रेम’ या शब्दाला बदनाम केले जात होते. या कारवाईमुळे पे्रमवीरांमध्ये ‘खुशी’ तर टवाळखोरांमध्ये ‘गम’ ची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.बीड शहरातील कॉफीशॉपमध्ये बसून काही जोडपे कॉफी पिण्याच्या नावाखाली अश्लिल चाळे करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी स्वत: गस्तीदरम्यान कॉफीशॉपची तपासणी केली होती. यावेळी शाहूनगर भागातील एका शॉपमध्ये त्यांना पडड्याआड अंधाऱ्या केबिनमध्ये अर्धनग्न अवस्थेत एक युगुल आढळले होते. त्यांनी या जोडप्याला समज देऊन सोडले होते. तर दुकानमालकावरही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांनी सर्वच ठाणे प्रमुखांना शॉप, हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, शॉपमध्ये केवळ कॉफीच विकावी, असे गैरप्रकार कशासाठी, असे म्हणत कबाडे यांनी दुकानमालकाला चांगलाच धडा शिकविला होता. कबाडे यांच्या कारवाईमुळे पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले होते.यापुढेही शहरात गस्त वाढवून छेडछाडीचे प्रकार टाळण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.छेडछाड, गैरप्रकाराची माहिती मिळताच अथवा तक्रार येताच तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कबाडे यांनी दामिनी पथकाला दिले आहेत.कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. खोटी कारवाई झाल्यास पथकावरही कारवाई करण्याचा इशारा कबाडे यांनी दिला आहे.