दिंद्रुड (जि. बीड) : अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली, तिचे अपहरण करण्यात आले असून तिचा शोध घेण्यासाठी दिंद्रुड पोलिसांनी ४० हजार रुपये मागितल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाऱ्या पोलिसांच्या मध्यस्थीचे कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने खळबळ उडाली असून, पैसे मागितल्याचा पोलिसांनी मात्र इन्कार केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर तसेच पोलीसांचा मध्यस्थ म्हणून मिरवणारा हनुमान फपाळ या दोघांचा तक्रारीत उल्लेख आहे.
माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांचा मध्यस्थ हनुमान याने मुलीचा तपास लावून परत आणायचे असेल तर साहेबाला ४० हजार रुपये खर्च द्यावा लागेल, असे सांगितले. जुळवाजुळव करून मुलीच्या वडिलांनी १५ हजार रुपये हनुमानकडे दिले. त्यानंतर चार-पाच दिवस झाले तरी तपास लागला नव्हता. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी ठाण्यात चौकशी केली. परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मध्यस्थी हनुमानला विचारणा केली असता, राहिलेले २५ हजार रुपये दिल्याशिवाय तपास लागू शकत नाही, असे त्याने सांगितले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबत तक्रार दाखल केली. बेपत्ता मुलीचा तपास लावावा आणि पोलीस मध्यस्थ हनुमान व स.पो.नि गव्हाणकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यात केली आहे.
पैशाची मागणी केली नाहीतपास सुरू असून, दिंद्रुड पोलिसांनी कुणालाही याप्रकरणी पैशाची मागणी केलेली नाही. आम्ही तपासात यश मिळविले आहे. मात्र, काही कायदेशीर बाबींमुळे उशीर होत आहे, लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावणार आहोत.-अनिल गव्हाणकर, सहायक पोलीस निरीक्षक, दिंद्रुड पोलीस ठाणे.