बीड : जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये नातेवाईकांचा वावर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी स्वत: त्याठिकाणी भेट देत बंदोबस्त नियुक्त केला. परंतु, तरीही लोक बिनधास्त कोरोना वॉर्डमध्ये जावून बाहेर येत आहेत. यावरून येथील अधिकारी, कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील पोलिसांना चौकीच सुटत नसल्याचे रविवारी समाेर आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी अचानक भेट देत याठिकाणी बसलेल्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताला पाठवले.
जिल्हा रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याने नातेवाईक व काही चमकोगिरी करणारे लोक कोरोना वॉर्डमध्ये जात आहेत. तसेच कसलीही काळजी न घेता बाहेर येऊन बिनधास्त फिरतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. काही लोक तर ऑक्सिजनशी छेडछाड करत असल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून यापूर्वीही जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी भेट देत बंदोबस्त नियुक्त केला होता. तसेच पासशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा सक्त सूचना केल्या होत्या. परंतु, वरिष्ठांनी सांगूनही बंदोबस्तावरील पाेलिसांना त्याचा काहीच फरक पडला नसल्याचे दिसते. रविवारी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी अचानक रूग्णालयाचा सुरक्षेचा आढावा घेतला असता, गेटवर एकही पोलीस कर्मचारी नव्हता. तसेच एक सुरक्षा रक्षकही मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्यानंतर गित्ते यांनी चौकीत बसलेल्या अधिकाऱ्याला बोलावून घेत परिस्थिती दाखवली. त्यानंतर कर्मचारी गेटवर पाठविण्यात आले. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांना गेटवर बंदोबस्तावर कोणी आहे की नाही, याचेदेखील उत्तर देता आले नाही. यावरून पोलिसांना येथील बंदोबस्ताचे किती गांभीर्य आहे, याची प्रचिती येते.
ऑक्सिजन प्लांटवरील कर्मचारी तत्पर
नाशिकच्या दुर्घटनेनंतर जिल्हा रूग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी बंदोबस्त नियुक्त करण्याच्या सूचना सीईओ अजित कुंभार यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे शुक्रवारी येथे कर्मचारी बंदोबस्तावर तत्पर असल्याचे दिसले. इतर ठिकाणी मात्र ढिसाळ कारभार होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकीच सुटत नसल्याचे दिसत आहे.
कोट
मुख्य गेटवरील सुरक्षेबाबत पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त केलेला आहे. परंतु, ते तेथे थांबत नसल्याचे दिसले. तसेच नातेवाईकही आत-बाहेर करताना दिसले. संबंधित अधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या सूचनाही केल्या. आता पोलीस अधीक्षकांना याबाबत कळवले जाईल.
- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.
===Photopath===
250421\25_2_bed_11_25042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयातील मुख्य गेटवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी अचानक भेट दिली. यावेळी पोलीस हजर नव्हते. केवळ एक सुरक्षा रक्षक होता. तसेच नातेवाईक आत-बाहेर करताना दिसले.