बीड : पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी सुरू केलेली महाराष्ट्र पोलीस कुटुंब योजना संजीवनी ठरू पाहत आहे. मागील वर्षभरात तब्बल १३१ लोकांना याचा लाभ मिळाला आहे. कोरोना, हृदयविकार, उच्चरक्तदाब, कर्करोग आदी गंभीर आजारांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
२००५ साली महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली. या अंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील आई, वडील, दोन मुले आणि पत्नी यांच्यावर मोफत उपचार करता येतात. बीड जिल्हा पोलीस दलातील १३१ लोकांवर आतापर्यंत या योजनेंतर्गत उपचार करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे कोरोनासारख्या अडचणीच्या परिस्थितीतही ही योजना कार्यान्वित होती. कोरोनाबाधित असलेल्या तब्बल १७ लोकांनी याचा लाभ घेत बीड व इतर जिल्ह्यातील मोठ्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. या योजनेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ होत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस लाभार्थ्यांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपाधीक्षक स्वप्नील राठोड, मानव संसाधनचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य योजना कक्ष काम करीत आहे. आनंद थोरात हे कक्षप्रमुख म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
या आजारांवर झाले उपचार
२०२० या वर्षांत हृदयविकाराच्या २१ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापाठोपाठ कोरोनाबाधित १७, उच्चरक्तदाब १०, कॅन्सर १२, न्यूमोनिया व डेंग्यू १५, ॲपेंडिक्स व पोटाचे इतर आजार १५, किडनी व आजार १२, अपघात २०, मेंदूचे आजार ३, अर्धांगवायू ३, इतर ३ अशा १३१ लोकांनी वर्षभरात याचा लाभ घेतला आहे.
बीडमध्ये ३, तर राज्यात १९८ रुग्णालये
या योजनेंतर्गत उपचार करण्यासाठी बीड जिल्ह्यात फिनिक्स हॉस्पिटल, दीप हॉस्पिटल आणि लोटस हॉस्पिटलची निवड करण्यात आलेली आहे. तर राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमधील १९८ खाजगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत उपचार केले जात आहेत.