कडा : आजी- आजोबाकडे शिक्षणासाठी आलेल्या एका तरूणाने गावातीलच अल्पवयीन मुलीला गुरूवारी फुस लावून पळवले होते. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात मुलीस शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील खडकत येथे सुरज कैलास मोरे (रा.डोणगाव ता.जामखेड जि.अहमदनगर ) हा आपल्या आजोबाच्या घरी शिक्षणानिमित्त राहत होता. याच गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून गुरुवारी त्याने फुस लावुन पळवले. मुलीचे पालक घरी आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी सुरज, त्याची आई बाईसाबाई कैलास मोरे व भाऊ विशाल कैलास मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. आष्टी पोलिसांनी भा.द.वि.363 नुसार फुस लावून पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या पाच तासात मुलीस डोणगांव जिल्हा अहमदनगर येथून आरोपींसह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. तसेच आरोपींना समजवजा नोटीस देऊन सोडवले. ही कामगिरी उपअधीक्षक विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोनबा हंबर्डे , पोलीस नाईक रघुनाथ आटोळे यांनी केली.