बीड : केज तालुक्यातील वीटभट्टीचालकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १५ लाखांच्या खंडणीसाठी जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दोन महिलांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कैलास गुजर या पोलीस कर्मचाऱ्याचादेखील समावेश होता. चौकशीमध्ये दोषी आढळल्यामुळे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कैलास गुजरला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे.
कैलास गुजर याची नेमणूक आष्टी पोलीस ठाण्यात नाईक या पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. पैशासाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढून केज तालुक्यातील एका वीटभट्टीचालकाची अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली होती. त्याचा आधार घेऊन १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. केज येथे पैसे घेण्यासाठी चारचाकीमधून काही जण आले.
मात्र, याप्रकरणी केज पोलिसांना पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. याप्रकरणी २५ जुलै रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कैलास गुजर याचा समावेश होता. तो पोलीस दलात कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली.