गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे अवैध वाळू उपस्याच्या उद्देशाने आलेले १५ हायवा ट्रक, जेसीबी चकलांबा पोलिस व महसुल विभागाच्या पथकाने जप्त केले आहे. ही कारवाई आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. तब्बल ४ कोटींचा मुद्देमाल जप्त करून पोलीस आणि महसूल पथकाने वाळू माफियांना दणका दिला आहे.
वाळू माफियांचे धाडस वाढत असून अवैध वाळू उपसा अहोरात्र सुरु आहे. राक्षसभुवन येथे पोलीस आणि महसूल पथकास अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यावरून पहाटे ५ वाजता संयुक्त पथकाने राक्षसभुवन येथे कारवाई केली. यावेळी वाळू उपसा करण्यासाठी आलेले तब्बल १५ हायवा ट्रक, जेसीबी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत तहसीलदार सचिन खाडे, पोलिस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंझुर्डे, तलाठी बाळासाहेब पखाले आदी अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता. जप्त वाहने राक्षसभुवन येथील शासकीय विश्रामगृह परिसरात लावण्यात आली आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस आणि महसूलच्या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळु उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.