अंबाजोगाई : तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे गुरुवारी लोकसभेसाठी मतदान सुरु असताना बंदोबस्तावरील पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस पाटलास एका मद्यपीने बेदम मारहाण केली. हा मद्यपी मतदानासाठी रांग तोडून आतमध्ये घुसताना पोलीस पाटलाने त्याला अडविले होते.अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आदेशित केल्यानुसार धायगुडा पिंपळा येथील पोलीस पाटील नवनाथ साहेबराव धायगुडे हे मतदान केंद्राच्या बंदोबस्तावरील पोलिसांना मदत करत होते. दुपारी ३ वाजता ते केंद्राच्या प्रवेशद्वारावर थांबून एकेका मतदारास आत सोडत होते. त्यावेळी विकास प्रकाश गोरे हा तरुण मद्यधुंद अवस्थेत तिथे आला आणि रांग तोडून आत जाऊ लागला. इतर मतदारांनी रांगेत येण्यासाठी सुनावले असता त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेंव्हा धायगुडे यांनी त्याला रांगेत येण्यासाठी बजावले. याचा राग आल्याने गोरे याने धायगुडे यांना बेदम मारहाण केली. बंदोबस्तासाठी असलेले फौजदार सय्यद आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपीच्या तावडीतून धायगुडे यांची सुटका केली. याप्रकरणी धायगुडे यांच्या तक्रारीवरून विकास गोरे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
अंबाजोगाईत पोलीस पाटलास बदडले; मद्यपीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:10 AM