राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ एप्रिलपासून १ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. तरी देखील काही नागरिक अनावश्यकरित्या घराबाहेर पडून कोरोना संसर्ग पसरवीत आहेत. अशा लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि गैरप्रकार थांबविण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. यात सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, पोलीस कर्मचारी व अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. हे पथसंचलन शिवाजी चौक, कानडी रोड, बसस्टँड, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला या प्रमुख मार्गावरून करण्यात आले.
===Photopath===
160421\deepak naikwade_img-20210416-wa0019_14.jpg