बीड : जिल्हा पोलिस दलात सुरु असलेल्या पोलिस भरतीमधील १००९ उमेदवारांची २४ जून रोजी होणारी मैदानी चाचणी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही चाचणी आता १ जुलै रोजी होणार आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही माहिती दिली.
जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई पदाची भरती सुरु आहे. २४ जून रोजी पहाटे ५: ३० वाजता शारीरिक व मैदानी चाचणीसाठी १००९ उमेदवारांना पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बोलावण्यात आले होते. दरम्यान २३ जून रोजी दुपारी १२: ०० वाजेदरम्यान तसेच दुपारी ४:०० वाजेदरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कवायत मैदानावर पाणी साचले व मोठ्या प्रमाणात चिखल झाला. त्यामुळे २४ जून रोजी आयोजित केलेली १००९ उमेदवारांची मैदानी चाचणी नैसर्गिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
ही मैदानी चाचणी १ जुलै २०२४ रोजी पहाटे ५: ३० वाजता निश्चित केली आहे. त्यामुळे २४ जून रोजी पोलिस भरतीसाठी या घटकात मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांनी १ जुलै रोजी पहाटे ५: ३० वाजता पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हजर राहण्याबाबत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कळविले आहे.