बीड : शहरात मागील काही दिवसांत मोबाईल चाेरीचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्यास पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. शुक्रवारी शहरातील राजीव गांधी चौक परिसरात नागरिकांनी एका मोबाईल चोराला त्याच्या दुचाकीसह पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते; मात्र नंतर पोलिसांनी तो अल्पवयीन आहे, ज्यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला त्यांनी काही तक्रार देण्यास नकार दिला असा निर्वाळा देत हा मोबाईलचोर सोडून दिला.
बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात मागील वर्षापासून भाजीविक्रेते बसतात. नगर नाका परिसर, श्रीराम नगर, पांगरी रोड, पिंपरगव्हाण रोड, सर्कस ग्राऊंड परिसर, भक्ती कन्स्ट्रक्शन, अंबिका चौक परिसर, आदर्श नगर, कॅनाॅल रोड परिसरातील शेकडो नागरिक रोज इथे भाजी खरेदीसाठी गर्दी करतात; मात्र नागरिकांची गर्दी होताच राजीव गांधी परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याठिकाणी मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी एकदिवसाआड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येतात; मात्र पुढे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे मोबाईल चोरीतील आरोपी पकडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, नागरिकांनी पकडून दिलेल्या मोबाईल चोराला पोलिसांनी सोडून दिल्यामुळे नेमका ‘अर्थ’काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्याची चौकशी केली असती तर मोबाईल चोरांचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता होती. याप्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
‘ज्याने तो मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला तो अल्पवयीन आहे, कुणाची काही तक्रारच नाही’, समज देऊन त्याला पालकांच्या हवाली केले. - साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे.