आधी मारले आता गोंजारले
शिरूर कासार : जवळपास एक महिना पावसाने दडी मारली होती ,शेतकरी आशाळभूत नजरेने प्रतीक्षा करत होता. या काळात जवळपास अर्ध्या शिवाराला फटका बसलाच. आधी पावसाने पिकाला मारले मात्र आता झालेल्या हलक्या पावसाने पिकांना पुन्हा गोंजारले आहे ,हलक्या शिवारातील पीक वाया गेली मात्र भारी जमिनीतील पिकांना आता या हलक्या पावसाने तारले असले तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे .
सिंदफणेला निर्जळी
शिरूर कासार : तालुक्यात सर्वात मोठी व शहराची जीवनदायनी समजली जाणारी सिंदफणा नदी श्रावण अर्ध्यावर आला असला तरी कोरडी ठाक असल्याने नदीला निर्जळी उपवास असल्याचे चित्र आजही कायम असल्याने भविष्यातील पाणीप्रश्न चिंतेचा विषय बनला आहे . पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपले मात्र अजूनही डोंगरावरचे सुद्धा पाणी नदीत आले नसल्याने सिंदफणा नदीचे पात्र ओसाड दिसत आहे .
बिट अंमलदारांना नव्या कोऱ्या दुचाकी
शिरूर कासार : येथील पोलीस स्टेशनच्या बीट अंमलदारांना नव्या कोऱ्या दुचाकी मिळाल्या असून आता कोणत्याही वेळी पोलीस पाहिजे त्याठिकाणी पोहचणार असल्याचे सांगितले जाते ,या मोटारसायकली नव्या असल्याने बिघाड ,घोटाळा होण्याचा प्रश्नच उरला नाही आपल्या आखत्यातील गावांचा कधीही फेरफटका पोलिसांना मारता येणार असल्याने पोलिसात समाधान व्यक्त होत आहे .
कपिलेश्वर मंदिरावर ओम नमः शिवाय जप
शिरूर कासार : येथील शहराच्या पूर्वेला डोंगरावर असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सोमवारपासून ओम नमः शिवाय अखंड निमजप सुरू झाला असून तिसऱ्या सोमवारी या नामजप सप्ताहाची सांगता होणार आहे ,साखळी पद्धतीने एक एक तास शिवभक्त विणा पहारा करत असून जप केला जात आहे .