केज : केज येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. क्रांतीनगर आणि खुरेशी मोहल्ला येथे ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यात सर्वत्र किराणा दुकान, टपऱ्या अगदी चहाच्या ठेल्यावरही सर्रास बंदी असलेला गुटखा विक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक ए राजा स्वामी यांना मिळताच त्यांनी विशेष पथकाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या नुसार विषेश पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने दि. २ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास केज पोलीस स्टेशन हद्दीत क्रांतीनगर भागात, वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोडाउनवर छापा टाकला असता. त्यात १७ लाख ४६ हजार २२० रु किमतीचा गुटखा मिळून आला. यामध्ये पप्पू कदम हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला. त्याच्या विरुद्ध भा. द. वि. २७२, २७३ व ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच रात्री ९:१५ वा. च्या सुमारास केज पोलीस स्टेशन हद्दीत, खुरेशी मोहल्ला, दर्गा रोड, केज येथे गोडाउनवर छापा टाकला. त्यात ७ लाख २ हजार ८६० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. या मध्ये अबुजर खैरउमिया खुरेशी हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. २७२, ३७३, ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण २४ लाख ४९ हजार ८० रु चा गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैद्य धंदे व गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.