...
तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
शिरूर कासार : गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकात मोठे गवत वाढले आहे. शेतातील तण काढून आता रब्बीचा पेरा कसा करायचा, यासाठी शेतकरी चिंतित आहे. शेत निर्मळ करण्यासाठी मोठा खर्च लागणार आहे. त्यासाठी तण फवारणीसाठी खर्च लागणार आहे. तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. बाजरी, भगर, मूग, सोयाबीन पिकात पिकांपेक्षा तणच जास्त झाल्याचे दिसून येत आहे.
...
शिरूरकरांचा पाणीप्रश्न अजूनही सुटेना
शिरूर कासार : शहराला नळ पाणीपुरवठा होत असलेल्या उथळा प्रकल्पावरील विद्युतपंप जळाला आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तो अद्यापही सुरू झाला नसल्याने तीन आठवड्यांपासून नळाला पाणी नाही. नागरिक पाणी विकत घेऊन गरज भागवत आहेत. दरम्यान, मोटर दुरुस्त करून आणली आहे. ती बसवली जाऊन पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.
...
सर्दी, ताप, थंडीचा उद्रेक
शिरूर कासार : तालुक्यात कोरोना आता कुठे मंदावला आहे. त्यात थंडी, तापाने नागरिक त्रस्त आहेत. रुग्णालयात साथरोगाने ग्रस्त रुग्णांची गर्दी वाढली आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनाची धास्ती असल्याने भीतीचे सावट कायम आहे.
...
सोयाबीन काढणीसाठी मजुरांची वानवा
शिरूर कासार : तालुक्यात यंदा सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर झाला होता. मध्यंतरी पावसाने त्यात पाणी साचले होते. आता उघडीप दिल्याने सोयाबीन काढणीला आले आहे. असे असले तरी सर्वच कामाची एकच घाई आल्याने मजुरांची वानवा आहे. त्यामुळे अनेकांनी सावड करून सोयाबीन काढणीसाठी सुरुवात केली आहे.