सोमनाथ खताळ
बीड : इकडे मराठा आंदोलनाच्या मागणीवरून बीड पेटले. तात्काळ बंदोबस्तावर हजर व्हायचे सोडून आजारी असल्याचे कारण सांगून एका पोलिस हवालदाराने ग्रामपंचायत निवडणूकीत बायकोचा प्रचार केला. याचे पुरावे मिळताच या अंमलदारावर निलंबणाची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शुक्रवारी हे आदेश काढले आहेत.
केशव मनोहर खाडे असे या हवालदाराचे नाव आहे. खाडे हे अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणूका सुरू आहेत. त्यांची पत्नी कांदेवाडी येथे सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. यासाठीच खाडे यांनी इकडे पोलिस दलात आजारी असल्याचे कारण सांगत रजा घेतली. त्यानंतर मतदारांच्या भेटी-गाठी घेण्यासह प्रचारही जोरात केला.
हा प्रकार पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना समजला. त्यांनी याची चौकशी केल्यानंतर खाडे यांचा प्रचारात सहभाग आढळला. त्यांनी तडकाफडकी त्यांच्यावर निलंबणाची कारवाई केली. दरम्यान, दोन दिवसांवर मतदान आहे. त्या आगोदरच अधीक्षक ठाकूर यांनी कारवाई करून अशाप्रकारे प्रचार करणाऱ्यांना दणका दिला आहे.