बीड : महिला पोलीस असणाऱ्या पत्नीस पोलीस पतीने हुंड्यातील एक लाख रुपये माहेरहून आण, असे म्हणत शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच शेती खरेदीसाठी वेतन खात्यावर पाच लाखांचे कर्ज काढ यासाठी पत्नीवर दबाव आणला. या प्रकरणी महिला पोलिसाने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी शिवाजीनगर ठाण्यात पोलीस पतीसह सासरकडील ११ जणांवर गुन्हा नोंद झाला. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मर्जीना सद्दाम शेख (२३, रा. बालेपीर, बीड) असे त्या महिला शिपायाचे नाव आहे. त्या बीड ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे पती सद्दाम शेख सत्तार (२८, रा. होळ ता. केज) हे देखील पोलीस असून ते परळी शहर ठाण्यात नोकरी करतात. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी या दोघांचे थाटामाटात लग्न झाले. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. दुसऱ्यांदा त्या गर्भवती आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा छळ होत असे. हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन ये व जमीन खरेदी करण्यासाठी वेतन खात्यावर पाच लाखांचे कर्ज घे तसेच पहिली मुलगी झाली, दुसरीही मुलगीच होईल म्हणून त्यांना सासरी त्रास सुरु होता. शिवाय १७ जानेवारी पासून पती त्यांच्यापासून विभक्त राहत आहे.
मर्जीना शेख यांनी अखेर शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन पती शेख सद्दाम शेख सत्तार, सासरा सत्तार युसूफ शेख, सासू नजदूम सत्तार शेख, दीर सुलतान सत्तार शेख, जाऊ आयशा सुलतान शेख, दीर सरदार सत्तार शेख, जाऊ गुलजान सरदार शेख, दीर सज्जाद सत्तार शेख, जाऊ काजल सज्जाद शेख, पतीची आत्या रेहाना हसन शेख, आजीसासू हालीमा युसूफ शेख यांच्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास फौजदार बालाजी ढगारे करत आहेत.
अल्पवयीन मुलीशी केले लग्नमर्जीना शेख यांनी दिलेल्या तक्रारीत पतीने केज येथील एका अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचे नमुद केले आहे. २८ मार्च रोजी हा कार्यक्रम झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, कायद्याचे ज्ञान असणारे आणि दुसऱ्यांना छळापासून परावृत्त करणाऱ्या पोलिसांमध्येच अशाप्रकारे छळ होत असल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमाही मलीन होत आहे.