बीड : बीडमध्ये अवैध धंदेवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कारवाईसाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला तिघांनी रस्त्यात अडवून अक्षरश: लाकडाने बदडले. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर स्वराज्यनगर कमानीजवळ सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून बीड शहरात अवैध धंदे वाढले आहेत. सर्रासपणे जुगार खेळला जात असून अवैध दारू विक्री केली जात आहेत. तसेच सिंधी विक्रीही केली जाते. या सर्व अवैध धंदेवाल्यांना काही पोलिसांकडून पाठबळ मिळत असल्याने त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. असाच एक प्रकार सोमवारी रात्री बीडमध्ये घडला. शिवाजीनगर ठाण्याचे सहायक फौजदार हरिश्चंद्र गिरी, पोकॉ.दादासाहेब उबाळे हे कर्मचारी बार्शी रोडने गस्त घालत होते.
स्वराज्यनगर कमानिजवळील एका टपरीवर त्यांना सिंधी विक्री होताना दिसली. मधुकर जोगदंड नामक व्यक्तीला हटकले. त्याने अरेरावी केली. एवढेच नव्हे तर तुम्ही काहीच करू शकत नाहीत, असे म्हणून जवळच असलेल्या बारीक नामक व्यक्तिने जोगदंडच्या हातातील सिंधीच्या बाटल्या घेऊन पोलिसांसमोरच प्यायला सुरूवात केली. आपल्यासमोरच हा प्रकार घडत असल्याने संतापलेल्या उबाळे यांनी जोगदंडला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात बारिकने उबाळे यांच्यावर हात उगारला. त्यानंतर कल्याणकर तिथे आला व जवळीच लाकडाने उबाळे यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये उबाळे यांचा हात फॅक्चर झाला. परंतु त्यांनी हार मानली नाही.
आपल्या सहकाºयांमार्फत पोलीस ठाण्याला कळविले. तोपर्यंत बारिक व कल्याणकर या दोघांना त्यांनी सोडले नाही. पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर उबाळे यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जोेगदंड, कल्याणकर व बारीक या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कारवाया केल्यास दुखावतो ‘इगो’पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकांच्या कारवायांनी जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. परंतु या कारवाया केल्यानंतर स्थानिक पोलसांचा ‘इगो’ दुखावतो. पथकाबद्दल त्यांच्यातून नाराजी असते. परंतु ही नाराजीच आता त्यांच्याच जिवावर बेतू लागली आहे. टपरीआडून चालणाºया या सिंधी विकणाºयांवरही वेळीच कारवाई केली असती, तर पोलिसावर हात उगारण्याची हिंमत या मुजोरांनी केली नसती, असे बोलले जात आहे.
पोलिसांमध्ये दहशतअवैध धंदे वाढले आहेत. याला जबाबदारही पोलीसच आहेत. असे अवैध धंदे चालू असल्याची माहिती असूनही ‘चिरीमिरी’साठी त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढते. अशातूनच पोलिसांना मारहाणीसारख्या घटनांना निमंत्रण मिळते. त्यामुळे पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांना पाठिशी न घालता कठोर करवाया करण्याची मागणी होत आहे.