पाटोदा (बीड ) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील देशाचा सुवर्णमल्ल आणी पाटोद्याचा भूमिपुत्र राहुल आवारे याचे मायभूमीत जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. शहराच्या प्रमुख रस्त्यावरून रथामधून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मिरवणूक रस्त्यावर दारोदार रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राहुलवर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. नागरी सत्कार सोहळ्यात माजी मंत्री सुरेश धस आणि आ. भीमराव धोंडे यांच्या टोलेबाजीचा आखाडाही चांगलाच रंगला.
राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या राहुलचा जन्मभूमीत जंगी सत्कार करण्याचा निर्णय झाल्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली. काही राजकारण्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढण्याच्या वल्गना केल्या प्रत्यक्षात नागरी सत्कार समितीने नियोजित केल्यानुसार रथामधून टोलेजंग मिरवणूक काढण्यात आली. राहुल कुस्तीची बाराखडी शिकलेल्या हनुमान व्यायाम शाळेपासून मिरवणूक निघाली चार तासानंतर नगरपंचायत समोर मैदानात नागरी सत्कार झाला.
व्यासपीठावर कुस्तीक्षेत्रातील नामवंत काकासाहेब पवार, हरियाणाचे रणधीरसिंग केंँगाल, पंढरीनाथ पठारे, गोविंद पवार, राजाभाऊ कोळी, अक्षय शिंदे, सईद चाउस, अतुल पाटील, राजाभाऊ देवकाते, गोकुळ आवारे, राधाताई महाराज, रामकृष्ण रंधवे महाराज, महेंद्र गर्जे, एल. आर. जाधव मधुकर गर्जे उपस्थित होते.
बक्षीस अन् अभिनंदनाचा वर्षावराहुल यास खंबीरपणे पाठिंबा देणारे पंढरीनाथ पठारे यांनी राहुलने आॅलिंपिक पदक जिंकल्यास पुण्यामधे थ्री बीएचके फ्लॅट देण्याची ग्वाही दिली. माजी मंत्री सुरेश धस यांनी आॅलिंपिकपर्यंत प्रतिमहा ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. आ. भीमराव धोंडे यांनी एकरकमी एक लाख रुपये आणि मुख्यमंत्र्यांकडून आणखी ५० लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले. उपस्थितांनी रोख बक्षिसे यावेळी दिली.
राजकीय टोलेबाजीया सत्काराच्या निमित्ताने विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुरेश धस आणी त्यांचे कट्टर विरोधक आ. भीमराव धोंडे यांनी एकमेकांचे चांगलेच चिमटे काढले. धस यांनी कुस्तीपटूंना राजाश्रय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मागच्या लोकसभेला पूर्वीच्या पक्षाला उमेदवार नव्हता. मला उभे केले. आता मला भाजपकडून उभे केले आहे. काय होईल हे २४ तारखेला कळेल. पण ‘जिथे कुणीच नाही (उमेदवार) तिथं मी’ असं सध्या राजकीय गणित झालं आहे, असे वक्तव्य धस यांनी केले.तर धोंडे यांनी शेलक्या शब्दांत धस यांना टोले लगावले. ते म्हणाले, सुरेश धस आता आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी माझा कधीच प्रचार केला नाही. मागचं सर्व मिटलं आणि फिटलं. आता मी धस ‘यांचाच’ प्रचार करणार, अशी ग्वाही दिली.
गुरुंच्या मार्गदर्शनामुळे उभा राहिलो
दहा वर्षापूर्वीच आंतरराष्ट्रीय कुस्ती जिंकण्याची पात्रता होती. मात्र दिल्ली, हरियाणावाल्यांनी अन्याय केला. संघर्ष चालू असताना मधल्या काळात कुस्ती सोडण्याचा विचार आला. मात्र, गुरुंच्या मार्गदर्शनामुळे नव्या उमेदीने उभा राहिलो. गावकऱ्यांनी केलेल्या प्रेमाचा आणि बक्षिसे यांचा वर्षाव वाया जाऊ देणार नाही. आॅलिंपिक जिंकून उतराई होण्याचा प्रयत्न करील. या मातीत मोठी गुणवत्ता आहे. येथे भव्य क्रीडांगण उभारून खेळाडूंना संधी द्या. येथून शेकडो राहुल तयार होतील, असा आशावाद व्यक्त केला.