- नितीन कांबळेकडा (बीड): आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झालेले मतभेद सामाजिक मतभेदात परावर्तित होऊ नये. हाच उद्देश घेऊन आरक्षण बचाव यात्रा निघाली असल्याची भूमिका वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. २५ जुलै पासून वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सुरू झाली आहे. आज आष्टी तालुक्यातील कडा येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
ॲड.आंबेडकर पुढे म्हणाले, दंगलग्रस्त ठिकाणी जाऊन सामाजिक द्वेष कमी करण्याची भूमिका कायमच वंचितने घेतली आहे. जरांगे याचं मराठा समाजाला आरक्षण ही मागणी आणि सगेसोयरे अध्यादेशाचा आग्रह याबद्दल राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा की विरोध हे राजकीय पक्षांकडून स्पष्ट होत नाही. आपल्या पक्षाची आरक्षणाची भूमिका मांडण्या ऐवजी उध्दव ठाकरे हे आंदोलकांना मोदीकडे जाण्याचा सल्ला देतात आणि आरक्षणामुळे महाराष्ट्राचा मणीपुर होईल हे शरद पवार यांचे वक्तव्य या दोन्हीही गोष्टी दुर्दैवी असल्याचे ॲड.आंबेडकर यांनी सांगितले.