लोकमत न्यूज नेटवर्क, अंबाजोगाई (जि. बीड) : ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही. जे आहेत ते फक्त जातींचे चेहरे आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची एकजूट झाली नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ॲड. आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अंबाजोगाईत पोहोचली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ओबीसींना मिळालेले आरक्षण काढून घेतले जात आहे. मात्र, याला कोणतेही राजकीय पक्ष विरोध करत नाहीत. ५५ लाख ओबीसी प्रमाणपत्रे वितरित झाली. हे चूक आहे की बरोबर आहे हे सांगण्यास कुणीही धजावत नाही. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यायचे की नाही, हा राजकीय विषय आहे. मात्र, तो सोडविण्याकडे पक्षांचे दुर्लक्ष होत आहे, अशी भूमिका ॲड. आंबेडकर यांनी मांडली. ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत शंभर जागा निवडून आल्या पाहिजेत, हे लक्ष्य ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.