कडा (बीड): गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आष्टी तालुक्यातील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेवरून आमदार सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे एकमेकांवर आगपाखड करत आहेत. दोघेही एकमेकांवर जोरदार टिका करत आहेत. आता या वादात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी उडी घेत दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. तुझमाझं करण्याऐवजी ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन धोंडे यांनी केले.
आजीमाजी आमदारांच्या पत्रकार परिषदांनी आष्टी तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल ७० गावांना फायदा होणाऱ्या विकास कामांमध्ये खोडा घातला आहे. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचे पत्र आ.धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या कामासाठी १५०० कोटी रुपये उपसा जलसिंचन योजनामधून मंजूर झाले होते. मात्र, सुरेश धस यांनी पत्र दिल्याने कामाला स्थगिती देण्यात आली आहे, असा आरोप आजबे यांनी केला होता.
यानंतर रविवारी सायंकाळी आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत थेट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना निविदा काढताच येत नाही. मात्र, अशी निविदा काढून जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप धस यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री म्हणून पाटील यांनी खोटेनाटे काम केले. खोटी निविदा काढली. प्रेशराईज केले. त्यांनी मराठवाड्याची फसवणूक करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे, असा इशारा देखील धस यांनी दिला. तसेच आमदार बाळासाहेब आजबे यांचे अडीज वर्ष केवळ माझ्यावर तोंडसुख घेण्यात गेले, अशी जोरदार दिका देखील धस यांनी केली.
माजी आमदार धोंडे यांची उडी या दोघांच्याही पत्रकार परिषेद होताच आज माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धस, आजबे या दोन्ही आमदारांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. दोन्ही आमदारांनी एकमेकांवर टिका करू नये, तुझमाझं करण्याऐवजी ही महत्वाची योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन धोंडे यांनी केले. तसेच या योजनेसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे देखील धोंडे म्हणाले.