अंबाजोगाई (जि. बीड) : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदारसंघातील घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी जवळपास ४० जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये बहुतांशी तरुणांचा समावेश आहे.
जि. प. प्राथमिक शाळा, जि. प. कन्या शाळा, सोमेश्वर विद्यालयातील मतदान केंद्रात ५० ते ६० लोक वाहनांतून हत्यारे घेऊन आले.
पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हत्यारे आणि दंडुक्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात पोलिस कर्मचारी, केंद्राध्यक्ष जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी ईव्हीएम मशीन आदळून नुकसान केले. सध्या या प्रकरणात सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उमेदवाराचे चिन्ह असलेल्या स्लिप वाटल्या, गुन्हा दाखल
सोलापूर : मतदान प्रक्रिया सुरू असताना उमेदवाराचे चिन्ह असलेल्या स्लिप वाटल्याबद्दल एमआयएम पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिली घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कुर्बान हुसेन नगर येथे घडली. कार्यकर्त्यांनी सार्वजनिक रोडवर एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांचा फोटो व पक्षाचे चिन्ह असलेल्या मतदान स्लिप मतदारांना वाटल्या.
याप्रकरणी प्रभाकर देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरा प्रकार कॅम्प शाळा लष्कर येथे दि प्रोग्रेस शाळेसमोरील रस्त्यावर घडला. याबाबत पोलिस हवालदार किशोर पोपट पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.