माजलगाव : शहरातील जुन्या मोंढ्यात जागोजागी पाइपलाइन लिकेज झाल्या असून अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने चक्क मोंढ्याचे प्रवेशद्वारच बंद झाले. या प्रश्नाकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अखेर मंगळवारी मोंढयातील व्यापाऱ्यांनी या नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन केले. नगरपालिकेच्या सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, सुनील भांडेकर, गणेश लोहिया, वैजनाथ घायतडक,ओंकार कारळकर,कृष्णा भुतडा, दिलीप खुर्पे , धनंजय सोळंके, अशोक बाक्कड ,विठ्ठल श्रीरंग आदी व्यापारी सहभागी झाले होते.
येथील जुना मोंढा शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून निम्म्या शहराचा वावर होत असतो. मात्र मागील एक महिन्यापासून मोंढ्याच्या प्रवेशद्वारावरच नालीच्या पाण्याचे जागोजागी डबके साचल्याने व्यापारी व नागरिक मेटाकुटीला आले आहेत. हे पाणी कोणी काढून द्यावे यावरून बाजार समिती व नगरपालिकेच्या वादात व्यापारी व नागरिकांना मात्र नाहक त्रास होत आहे. सध्या नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर दिले असून या टेंडरमध्ये केलेल्या करारात मोंढा भागातील कचरा उचलू नये व स्वच्छता करू नये असे कुठेही म्हटलेले नाही. तसेच नगरपालिका मोंढ्यातील घर मालकांकडून विविध प्रकारचे कर आकारते, असे असतांना नगरपालिकेचे मोंढ्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
बाजार समिती व नगरपालिकेच्या वादात कोणीही नाल्या काढत नसल्याने नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. जागोजागी पाइपलाइन लिकेज झालेल्या आहेत. यामुळे सध्या मोंढ्यात सर्वत्र घाण पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याचे समजताच मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी तेथे येऊन आठ दिवसात नालीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.