परळी : येथील सामाजिक पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे व तिला न्याय मिळाला पाहिजे, तसेच समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी शनिवारी येथे झालेल्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.
शहरातील पूजा चव्हाणची पुणे येथे आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी. या चौकशीत जी सत्यता समोर येईल, ती समाजाला मान्य असेल, परंतु चौकशीपूर्वीच समाजाची बदनामी होऊ नये. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव अद्याप स्पष्ट नाही, परंतु त्यांची बदनामी केली जात आहे, तसेच पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, जे दोषी पुढे येतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही या बैठकीत सर्वांनी एकमत मांडले. समाजाची बदनामी नाही थांबली, तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला. परळी येथे झालेल्या बैठकीस बंजारा समाजाचे नेते डी.एस. राठोड, वसंत राठोड, संतोष राठोड, भगवान पवार, सूर्यभान पवार, प्रदीप पवार, पप्पू चव्हाण आदी उपस्थित होते.