बीड : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने गरिबांचा बर्गर असणारा वडापाव शहरात काही ठिकाणी महाग झाला आहे. तर काही ठिकाणी आधी होते तेच दर स्थिर आहेत. शहरातील हॉटेलमध्ये सकाळी पुरी- भाजी, उपमा, शिरा आणि भजी, जिलेबी ग्राहक चवीने खातात. तर सायंकाळी कचोरी, समोसा, रगडा पॅटिस, दाबेली, पाव भाजीची चव चाखतात; मात्र सर्वाधिक ग्राहकांचा वडापाव खाण्याकडे कल आहे. अनेक जण हौसेपोटी वडापाव खरेदी करतात तर काहीजण वडापाव खाऊनच दिवस काढतात. मात्र मागील तीन-चार महिन्यांपासून गॅस, खाद्यतेल, बटाट्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाल्याने वडापाव विक्रेत्यांनी आकार कमी करून दर मात्र स्थिर ठेवले आहे. तर काही विक्रेत्यांनी दिवसभराचा खर्च पाहता महागाईमुळे वडापाव, भजीचे दर वाढविले आहे. बीडमध्ये १० रुपयांना मिळणाऱ्या दोन वडापावची प्लेट मागील तीन वर्षांपासून १५ रुपये आहे. तर भजी प्लेट किंवा समोसा दहा रुपयांना मिळतो; मात्र दर शहरातील ठराविक भागातच आहेत. इतर भागात मात्र वडापावची प्लेट २० रुपयांना तर भजीप्लेट १५ रुपयांना विकली जाते.
१) म्हणून महागला वडापाव
वडापाव, कचोरी किंवा समोसासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरांत चांगलीच वाढ झाली आहे. १५ किलो तेलाचा डबा दोन हजाराला मिळत होता. तो आता २३०० च्या पुढे गेला आहे. बेसनाचे भाव ७० रुपये किलोवरून ९० रुपये झाले. बटाटे १५ वरून २० रुपये तर गॅस सिलिंडरला १७०० रुपये मोजावे लागतात. आचारी, कामगारांसह इतर खर्च पाहता विक्रेत्यांना वडापाव किंवा भजी, समोसा कचोरीचे भाव वाढवावे लागले आहेत.
२) वडापावशिवाय दिवस जाणे कठीण
कामासाठी सकाळी गावाकडून बीडमध्ये येतो. भूक लागल्यावर कमी पैशात मिळणारा वडापाव नेहमी खातो. इतर पदार्थांचे दर परवडत नाही. वडापाव खाऊनच भूक भागवतो. दिवस काढतो. गावी गेल्यानंतरच जेवण करतो. -- अभिमान चिरके, आनंदवाडी.
------------
वडापाव खाऊनच अनेक जण आपले दैनंदिन कामकाज करत असतात. त्यांना मिळणारा रोजगार पाहता वडापाव त्यांची भूक भागविणारा पदार्थ आहे. जेवण किंवा नाष्टा किंवा इतर पदार्थांचे दर जास्त असून या तुलनेत वडापाव स्वस्त आहे. -- सिद्धेश्वर राऊत, बीड.
३) कोरोनाचा मोठा फटका
तेल, गॅस, बेसनचे भाव वाढले आहेत. तरीही नफ्यात घट करून आम्ही वडापावचे दर स्थिर ठेवले आहेत. एकूण खर्च परवहत नाही, परंतू जोडलेला ग्राहकही तोडता येत नाही. अनलॉकनंतर ग्राहकही कमीच आहेत. -- अर्जुन कदम, वडापाव विक्रेता, बीड.
---------
कोरोनामुळे आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. ग्राहक आहेत पण कमी प्रमाणात असल्याने दिवसभराचा व्यवसाय कमी झाला आहे. महागाईमुळे भाव वाढविणे सध्यातरी जोखमीचे ठरेल. त्यामुळे वडापावचे भाव आमच्या भागात कमी आहेत.