अवैध धंदे बोकाळले
जातेगाव : गेवराई तालुक्यात जातेगाव हे सर्कलचे गाव आहे. येथे आठवडी बाजार गुरुवारी भरतो. या दिवशी टपरी व किराणा दुकानांवर सर्रास गुटखा मिळतो. तसेच अवैध धंदे, अवैध देशी-विदेशी दारू, अवैध वाहतूक, मटका आदी धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन यावर नियंत्रणाची मागणी होत आहे.
पाणंद रस्त्याची दुर्दशा; नागरिकांना त्रास
बीड : तालुक्यातील जेबापिंप्री येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता करण्याची मागणी होत आहे.
मेंढ्याचे कळप दाखल
शिरूर कासार : तालुक्यात सध्या चाऱ्यासाठी बाहेरून मेंढ्यांचे कळप दाखल झाले आहेत. मेंढपाळ तालुक्यात आपल्या मेंढरूसह जागा बदलत तळ ठोकत आहे. शेकडो मेंढ्यासह त्यांचे सोबत रोजचा फिरता संसार असून, गरजेपुरत्या गायीसुध्दा दिसून येत आहेत. मोकळे झालेल्या कपाशीच्या शेतात तालुक्यातील शेतकरी मेंढ्याच्या लेंडीखताच्या अपेक्षाने मुक्कामी आश्रय देत आहे.
नालीचे पाणी रस्त्यावर
धारूर : शहरातील उदयनगरात तुंबलेल्या नालीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नालीची तत्काळ दुरुस्ती करावी आणि नागरिकांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. याकडे अद्यापही लक्ष दिले गेले नसल्याने या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.