राजमुद्रा संघटनेतर्फे रक्तदान शिबिर
बीड: राजमुद्रा सामाजिक संघटनेतर्फेे सोमवारी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात वृक्ष लागवड, वह्या-पुस्तके व अनाथ मुलांना अन्न-धान्याचे वाटप, तसेच महा रक्तदान शिबिराचा समावेश आहे. सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक किशोर पिंगळे यांनी केले आहे.
अवैध प्रवासी वाहतूक, पोलिसांचे दुर्लक्ष
पाटोदा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. खेडेगावांना बस वाहतूक सुरू झाली नसल्याने, अवैध प्रवासी वाहतुकीवर नागरिकांचा प्रवास सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुख्य चौकामधील सिग्नल बंद अवस्थेत
वडवणी : शहरातील मुख्य चौकांमध्ये असलेले सिग्नल मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे हे सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या
रायमोहा : येथील रस्त्यांवर अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघात झाल्याचेही उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरून हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
पालवण : बीड तालुक्यातील पालवणमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मोठे वाहन गेल्यास दुचाकीचालकांना समोरचे वाहन दिसत नाही.
धारूरच्या अनेक प्रभागांत अंधार
धारूर : शहरातील अनेक प्रभागांतील अनेक विद्युत खांबांवर दिवे नसल्याने, रहिवासी, तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
केज : केज पोलीस ठाणे हद्दीत चोरी व इतर गुन्ह्यांचे प्रमाण मागील काही महिन्यांत वाढले आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी होत असून, दाखल गुन्ह्यांचा छडा तातडीने लावावा व चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी होत आहे.