अपूर्ण कामाने गैरसोय
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूरमार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत असून, अनेक वेळा महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे.
हरणांचा उपद्रव
अंबाजोगाई : तालुक्यातील आपेगाव परिसरात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली. मात्र, हरणांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकाला फटका बसत आहे. हरीण, काळविटाचा कळप १० ते ५०च्या संख्येने असतो. हे कळप पिके फस्त करीत आहेत.
रात्रीची गस्त सुरू करा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात लहान मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वसाहतीत असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी अनेक भागांतील नागरिकांमधून केली जात आहे.
रस्ते अरुंद
बीड : नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात.
बोंडअळीबाबत मार्गदर्शनाची गरज
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कापसावर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी अरविंद जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.