मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ
बीड : शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांत मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी मोटारसायकलस्वारांना धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रस्त्याने जाताना अनेकांचे मोबाईल हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी मोबाईल चोरीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
......
राख प्रदूषण थांबविण्याची मागणी
परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातून अवैध राख वाहतूक केली जाते. परळी तालुक्यात अनेक रस्त्यांवर राख सांडल्याने प्रदूषण निर्माण होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दाऊतपूर शिवारातून सध्या मोठ्या प्रमाणात राख वाहतूक होत आहे. तरी राखेचे प्रदूषण थांबवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
आधार केंद्र सुरू करण्याची मागणी
बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात अनेक ठिकाणी आधार केंद्र बंद होते. अजूनही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आधार केंद्र सुरू झाली नाहीत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नवीन आधार कार्ड काढणे, दुरुस्ती यासारखी अनेक कामे खोळंबली आहेत. तरी बंद असलेली आधार केंद्रे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
...
कॅनॉल रोड परिसरात कच-यांचे ढीग
बीड : शहरातील कॅनॉल रोड व महाराष्ट्र बँक कॉलनी परिसरात सध्या कच-यांचे ढीग मोठ्या प्रमाणात साचले आहेत. दरम्यान, पावसामुळे कचरा कुजून तो सडल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तरी बीड नगरपालिकेने तातडीने कचरा उचलावा, अशी मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.
....
पिक विम्याबाबत शेतकरी वर्गात उदासीनता
शिरूर कासार : तालुक्यात मागील दोन वर्षांपासून शेतक-यांंनी पीकविमा भरला; परंतु अद्याप पीकविमा न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. दोन वर्षात विमा न मिळाल्याने विमा कंपन्यांवर शेतक-यांचा विश्वास राहिला नाही. यामुळे यंदा पीकविमा भरण्यासाठी शेतकरी उदासीनता दिसत आहे.
....
म्हसोबावाडी-सावरगाव रस्त्यावर खड्डे
धानोरा : आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी-सावरगावदरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या जागोजागी खड्डे पडले आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
..