परळी : तालुक्यातील लाडझरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर हर महादेव पॅनेलने सर्वच्या सर्व जागेवर विजय प्राप्त करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. गेल्या तीस वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या सदस्यांना नाकारून नवीन तरुणांना या निवडणुकीत मतदारांनी कौल दिला आहे.
या निवडणुकीत दोन पॅनल प्रमुखही पराभूत झाले आहेत व विरोधी दोन पॅनलचा धुव्वा उडाला आहे. परळी तालुक्यातील लाडझरी येथे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या नऊ जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पॅनल प्रमुख शिरीष नाकाडे व व्यंकटराव मुंडे यांच्या नेतृत्वाखालील हर हर महादेव पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये शिरीष नाकाडे, राजाराम पंडित मुंडे, रामराव चाटे, रुक्मीणबाई चाटे, विठ्ठल कांबळे, मंगल व्यंकटराव मुंडे, सरस्वतीबाई मोठे, भारतबाई गोमसाळे, संगीता महादेव मुंडे यांचा समावेश आहे.
पॅनल प्रमुख शिरीष नाकाडे यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले की, लाडझरीमध्ये ग्रामपंचायतीची अनेक वर्षांपासून सत्ता भोगत असणाऱ्या सदस्यांना मतदारांनी सपशेल नाकारून गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या आमच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली होती या निवडणुकीत मतदारांनी आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले आहे.