शेतकरी संघटनेने केले होते आंदोलन : पालकमंत्र्यांनी घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०२० च्या खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या मुसळधार अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. सुमारे ४ लाख ३२ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासकीय पंचनाम्यात होता. मात्र, कंपनीकडून केवळ २० हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला होता. याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी आंदोलन केले होते. याची दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासकीय अहवालानुसार पीक विमा देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या शिष्टमंडळास दिले.
प्रधानमंत्री पीक योजनेत जवळपास १७ लाख शेतकरी सभासदांनी सहभाग घेत मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांचा पीक विमा भरला होता. मात्र संबंधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाईपोटी फक्त २० हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या बीड-परळी राज्य महामार्गावरील घाटसावळी येथे ५ ऑगस्ट रोजी दीड तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. नुकसान भरपाईपात्रबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे १५ ऑगस्टपर्यंत जमा करावेत, फसवा बीड पीक विमा पॅटर्न रद्द करावा, अन्यथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालण्याचा इशारा करपे यांनी दिला होता.
या आंदोलनाची सकारात्मक दखल घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत १३ ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमाप्रश्नी जिल्हाधिकारी, संबंधित पीक विमा अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. जिल्ह्यातील ३ लाख पात्र शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळेल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे शिवक्रांती संघटनेचे गणेश बजगुडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष लहू गायकवाड पाटील, कमलाकर लांडे, सुरेश घुमरे, प्रमोद पांचाळ, सुग्रीव करपे, अशोक साखरे, संदीप करपे, बापू जोगदंड, कैलास थोटे, परमेश्वर वीर, प्रदीप घुमरे, अंकुश घुमरे, अंगद किवणे, भैरवनाथ माने, सुनील जोगदंड, श्रीराम वीर, दत्ता पवार, भक्त प्रल्हाद घुमरे, अंगद पैठणे आदी शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.
....
...तर मोठे आंदोलन केले जाईल
३ लाख शेतकऱ्यांना प्रशासकीय पंचनाम्यानुसार पीक विमा रक्कम खात्यावर जमा करण्याचे आश्वासन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. मात्र, हे आश्वासन वेळेत पूर्ण झाले नाही तर जिल्हाभरातून शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन पीक विमाप्रश्नी उभे केले जाईल, असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.