लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचेही उदारहरणे आहेत. असे असले तरी एकदा रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रुग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानेच पोस्ट कोविडमुळेही रुग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही १५ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट समाधानकारक असला तरी यातील काही रुग्णांना घरी गेल्यावरही थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहेत. अगोदरच कोरोनामुळे घाबरलेले हे रुग्ण रुग्णालयात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागानेच आशा, अंगणवाडीताई यांच्यामार्फत या रुग्णांशी संपर्क साधण्याची गरज आहे. यामुळे त्यांना आधार मिळेल.
ई-संजीवनीचा लाभ घ्या
राज्यात सर्वत्र घरबसल्या उपचार घेण्यासाठी शासनाने ई-संजीवनी ही वेबसाईट व ॲप तयार केले आहे. याच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत नागरिक घरूनच मेसेज करून उपचार घेऊ शकतात. आजार गंभीर असेल तर तात्काळ जवळच्या आरोग्य संस्थेत जाण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाकाळात ही वेबसाईट जास्त लाभदायक ठरली होती.
ओपीडी सुरू करणार
पोस्ट कोविड रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू करीत आहोत. तसेच ज्यांना लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी ई-संजीवनीमार्फत सेवा देण्याचा विचार केला जात आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची माहिती घेत नाहीत. लक्षणे असतील तर उपचार केले जातात.
- डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड