दीपक नाईकवाडे
केज
: तालुक्यातील दहिफळ व लिंबाची वाडी येथील विद्युत वितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता एक लाख वीस हजार रुपये परस्पर घेऊन अनधिकृत तीन विद्युत रोहित्र बसवल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात विद्युत वितरण कंपनीच्या तंत्रज्ञासह बारा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वसुलीसाठी गेल्यानंतर उघडकीस आला.
विद्युत वितरण कंपनीच्या प्रधान तंत्रज्ञ पदावर सय्यद वहीदोद्दीन हे केज उपविभागांतर्गत मस्साजोग शाखेत दहिफळ, देवगाव, लिंबाची वाडी येथील वीज दुरुस्तीसह वीज कंपनीचे काम ते पाहतात. दहिफळ येथील रामहारी प्रल्हाद सुरवसे यांना वेल्डिंग फॅब्रिकेशनसाठी विद्युत वितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्याकडून २० हजार रुपये घेत त्यांना २५ के. व्ही.चा विद्युत रोहित्र बसवून दिला. लिंबाचीवाडी येथील शेतकरी बाबासाहेब रावसाहेब माने, मुकीद भास्कर माने, विक्रम नामदेव काकड, महारुद्र भानुदास काकड, नानाभाऊ नामदेव माने, रामराव तात्या माने, श्रीकांत विष्णू माने, नितीन रामराय माने, बाळू सखाराम माने, अभिमान विश्वनाथ हराळे यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन त्यांना लिंबाची वाडी तलावाजवळच्या वॉटर सप्लाय रोहित्रावरून बेकायदेशीर पाच विद्युत खांब उभे केले. तसेच १०० केव्हीचे विद्युत रोहित्र बसवून दिले. तर गावात सौभाग्य योजनेच्या सिंगल लाईनचा वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रावरूनही एक विद्युत खांब उभा करत १०० केव्हीचा अनधिकृत विद्युत रोहित्र बसवून दिला. परवानगी नसताना तीन रोहित्र बसविल्याचा प्रकार वीज बिलांच्या वसुलीसाठी गेलेल्या विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता साईराज नागवेकर यांच्या निदर्शनास आला. केज पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून विद्युत वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ वहिदोद्दीन सईदोद्दीन सय्यद, रामहरी प्रल्हाद सुरवसे, बाबासाहेब रावसाहेब माने, मुकिंदा भास्कर माने, विक्रम नामदेव काकड, महारूद्र भानुदास काकड, नानाभाऊ नामदेव माने, कामराव तात्या माने, बाळू सखाराम माने, अभिमान विश्वनाथ हराळे यांच्या विरोधात बुधवारी रात्री केज पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ढाकणे करीत आहेत.
रोहित्रासह साहित्याची बीड येथून खरेदी
शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र बसविण्यास विद्युत वितरण कंपनीची कोणतीही परवानगी नसताना विद्युत वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ वहिदोद्दीन सईदोद्दीन सय्यद यांनी व शेतकऱ्यांनी बीड येथून रोहित्र व रोहित्राची उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची बीड येथून खरेदी केली असल्याचे कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ वहिदोद्दीन सईदोद्दीन सय्यद यांनी आपल्या लेखी जबाबात सांगितले आहे.