व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.
‘जैविक’चा धोका
अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सुविधांचा अभाव
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
इंटरनेट सेवा मिळेना
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झालेली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.
विजेचा लपंडाव
अंबाजोगाई : शहर व परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. अडचणीतील बाजारपेठेला याचा फटका बसत आहे.