बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
नदीचे पात्र झाले अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीपात्रातील स्वच्छतेची मागणी होत आहे.
विषाणूजन्य आजार
अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारांसाठी गर्दी वाढू लागली आहे.
स्वच्छतागृहाची दुर्दशा
केज : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
कारवाईची मागणी
बीड : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. नागरिक विनामास्क फिरत आहेत. या लोकांवर कारवाईची मागणी होत आहे.