......
कृषी दुकानांपुढे वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरातील कृषी दुकानांपुढे वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील मोंढा रोड व मुख्य चौक बाजाराला जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक कृषी केंद्र आहेत. सध्या शेतकऱ्यांची बी-बियाणे व खते खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे खते व बी-बियाणांसाठी आलेली वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. य मुख्य मार्गावरही अनेक वाहने रस्त्यावर उभी आहेत. यामुळे वाहतूक खोळंबली जात आहे. दोन, दोन तास रस्त्यावर वाहनांना ताटकळत थांबावे लागत आहे.
----------------------
गतिरोधक बनले धोकादायक
अंबाजोगाई : शहरापासून जवळ असलेल्या भगवानबाबा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य रस्त्यावरील दोन्ही ठिकाणचे गतिरोधक निमुळते झाले आहेत. त्यामुळे छोटे वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. एक तर हे गतिरोधक काढावे नसता, नव्याने गतिरोधक उभारावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. पावसामुळे या मार्गावर चिखल होत आहे. त्यामुळे अनेकांची घसरगुंडी होत असल्याने वाहनधारकांत नाराजी आहे.
---------------------
महावितरणने कर कमी करावेत
अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटर धारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीज ग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून महावितरणने वीज ग्राहकांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटर धारक वीज ग्राहकांनी केली आहे.
---------------------------
स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण
अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी मोहीम आखण्याची गरज निर्माण झाली आहे.