माजलगाव : शहरापासून जवळच असलेल्या देवखेडा परिसरात आठ दिवसांपासून तारा तुटलेल्या असताना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तारा जोडण्यास वेळ नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गोशाळेतील गायींना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी आणावे लागत आहे. याचा गोशाळाचालकांना आर्थिक फटका बसत आहे.
आठ दिवसांपूर्वी धरणाच्या बाजूला असलेल्या देवखेडा येथे हवेमुळे अनेक पोलवरील तारा तुटल्या होत्या. ८-१० दिवस उलटले असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व लाइनमन या ठिकाणी आलेले नाहीत. या तारा जोडण्यासाठी गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क केला असता, त्यांनी ‘आज करू, उद्या करू’ असे म्हणून टाळाटाळ केली. यामुळे गावातील नागरिकांना ऐन सणासुदीत अंधारात सण साजरा करण्याची वेळ आली.
आठ दिवसांपूर्वी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने धरणाच्या पाण्यावर बसविलेल्या गोशाळेच्या मोटारी वाहून गेल्या. या ठिकाणी नवीन मोटारी टाकल्या तर आता तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद आहे. यामुळे या गोशाळेत जवळपास ४०० गायींना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने गोशाळाचालकांनी टँकरद्वारे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
130921\img_20210913_115546_14.jpg~130921\img_20210913_115919_14.jpg