लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी तब्बल आठ तास अर्ध्या बीड शहरातील गायब होती. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कंट्रोल केबल जळाल्यामुळे ही वीज बंद असल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला.बीड शहरातील नगर रोड परिसरातील विविध भागांत रविवारी पहाटेच वीज गेली. याबाबत महावितरणकडे ग्राहकांनी वारंवार विचारणा केली, मात्र त्यांनी उत्तरे देण्यास नकार दिला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास वीज गेल्यानंतर ती दुपारी १२ वाजेच्या सुमारास आल्याचे नागरिकांनी सांगितले. पहाटेच वीज गेल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. तसेच दुपारपर्यंत वीज न आल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.दरम्यान, महावितरणचे नगर भागाचे सहायक अभियंता मिसाळ यांना विचारले असता उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्याने वीज गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याच भागातील नव्हे तर बीड शहरातील विविध भागांत वारंवार वीज पुरवठा या ना त्या कारणाने तासनतास खंडीत होत आहे. यावर उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यास महावितरण अयशस्वी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.
निम्म्या बीड शहराचा वीजपुरवठा ८ तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:04 AM