धारूर : केज, धारूरसह बारा गाव पाणीपुरवठा योजनेचे १० कोटी ९८ लाख ५३ हजार ९८३ रुपयांचे वीजबिल थकल्याने २२ फेब्रुवारी रोजी खंडित केलेला वीजपुरवठा केज नगर पंचायत व धारूर नगरपालिकेने प्रत्येकी ३० लाख याप्रमाणे एकूण ६० लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनंतर २ मार्च रोजी वीजपुरवठा चालू करण्यात आल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला दिली. पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा तिढा सुटता सुटेना, असे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात दिले होते, त्यानंतर हालचाली झाल्याने वीज जोडणी करण्यात आली.
केज धारूरसह बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील विद्युतपंपाचे १० कोटी ९८ लाख ५३ हजार ९८३ रुपयांचे वीजबिल भरण्यात न आल्याने केज धारूरसह बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या विद्युत पंपाचा वीजपुरवठा २२ फेब्रुवारी रोजी खंडित केला होता. तर ३ कोटी ५५ लाख ४८ हजार ६१८ रुपयांच्या थकबाकीपोटी जलशुद्धीकरण केंद्राकडेही वीजबिल थकले होते. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने मांजरा धरणात पाणी असतानाही केज धारूरसह बारा गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. धारूर नगरपालिकेने ३० लाख रुपयांचा भरणा केला असून नागरिकांना पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईल, असे मुख्याधिकारी नितीन बागूल यांनी सांगितले. तर नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी धारूर केजसह बारा खेडी पाणीपुरवठा योजनेची जुनी थकबाकी जिल्हा परिषदेने भरावी आणि चालू थकबाकीचे साठ हप्ते करून देण्याची मागणी महावितरणकडे केली असून लवकरच याबद्दल निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
केजकरांना पाणीपुरवठा पूर्ववत
दरम्यान, नऊ दिवसांनंतर केज धारूर पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा जोडण्यात आल्याने नागरिकांना पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. केज धारूर पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलापोटी केज नगर पंचायतीने ३० लाख रुपयांचा भरणा केला असून नागरिकांना पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे केज नगर पंचायतचे पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे यांनी सांगितले.